चाळीसगाव: प्र.दे.टाकळी ग्रामपंचायत प्रशासनांतर्गत दलित वस्तीत सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचे समोर आले आहे. कामांच्या निकृष्ट दर्जाबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, विशेषतः भूमिगत गटार, गट्टू बसवणे आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला आहे.
निकृष्ट कामाचा नमुना: भूमिगत गटार व गट्टू
प्र. दे. टाकळी येथील दलित वस्तीच्या विकासासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असताना, प्रत्यक्ष कामाची स्थिती मात्र दयनीय आहे.
अधवट कामे: भूमिगत गटार योजनेत अनेक ठिकाणी चेंबरच बसवण्यात आलेले नाहीत.

सुरक्षेचा प्रश्न: गटारीचे पाइप जमिनीच्या वर दिसत असून, यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
कमी दर्जा: बसवण्यात आलेले गट्टू (Paving Blocks) अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, ते काही दिवसांतच उखडतील अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
स्वच्छतेचा फज्जा: कचऱ्याचे साम्राज्य
एकडे ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा गाजावाजा होत असताना, प्र. दे. टाकळी गावात मात्र कचरा व्यवस्थापनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. गावातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचले असून, नियमित स्वच्छता होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

”शासनाचा पैसा जनतेच्या सोयीसाठी असतो, मात्र येथे नियोजनाचा अभाव दिसत आहे. विकासकामे केवळ कागदावर न राहता ती दर्जेदार व्हायला हवीत. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी.”
— संतप्त ग्रामस्थ, प्र. दे. टाकळी (ता. चाळीसगाव)
जबाबदारी कुणाची?
या सर्व कामांची मुख्य जबाबदारी ग्रामपंचायत प्र. दे. टाकळी प्रशासनावर आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाचे या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामस्थांनी आता या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.













