जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले; शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
धुळे:शासकीय हमीभाव केंद्रावर मका खरेदीची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असून, खरेदीचे अत्यल्प उद्दिष्ट आणि हेक्टरी उत्पादकतेच्या जाचक अटींमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली, मात्र परिसरात परीक्षा सुरू असल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलकांना जेल रोड परिसरातच रोखले.
उद्दीष्ट संपले, नोंदणी ५० हजारांच्या पार
देऊर बु॥ येथील शेतकरी विजय तुळशीराम देवरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी प्रशासकीय धोरणांचा निषेध केला आहे. शासनाने सुरुवातीला १८०० क्विंटल आणि त्यानंतर ३८०० क्विंटलचे दिलेले वाढीव उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. मात्र, जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ५० हजार क्विंटल मक्याची नोंदणी झाली आहे. हेक्टरी उत्पादकता केवळ २४.५७ क्विंटल गृहीत धरली जात असल्याने, प्रत्यक्ष उत्पादनाच्या तुलनेत शासनाकडून अत्यल्प मका खरेदी केला जात आहे.

बाजारात लूट, घरात नासाडी
सध्या खुल्या बाजारपेठेत मक्याला केवळ १२०० ते १५०० रुपये भाव मिळत आहे. या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे. दुसरीकडे, हमीभाव केंद्रावर नंबर लागेल या आशेने महिनाभरापासून मका सुकवून साठवून ठेवला आहे. मात्र, साठवलेल्या मक्याची उंदीर आणि घुशींमुळे मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असल्याची कैफियत विजय देवरे यांनी मांडली.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
- मका खरेदीचे उद्दिष्ट तातडीने वाढवावे.
- हेक्टरी उत्पादकतेची मर्यादा वाढवून प्रत्यक्ष उत्पादनानुसार खरेदी करावी.
- खरेदी प्रक्रियेला गती देऊन नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा.
पोलीस प्रशासनाकडून आंदोलनाला पायबंद
शेतकरी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना, परिसरात परीक्षा केंद्र असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आंदोलकांना जेल रोडवरच अडवले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिथेच थांबून आपला निषेध नोंदवला आणि प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे

.











