धुळे : शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा शिवारात धुळे जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ४१ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एका ५० वर्षीय शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त माहितीवरून टाकली धाड
दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, महादेव दोंदवाडा शिवारात राशा समदा पावरा (वय ५०) हा आपल्या मालकीच्या शेतात प्रतिबंधित गांजाची (कॅनाबिस प्लांट) बेकायदेशीर लागवड करून त्याची विक्रीच्या उद्देशाने जोपासना करत आहे.

माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना अवगत करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्याचे आदेश मिळवण्यात आले.
दोन किमी पायपीट आणि धाडसी कारवाई
शिरपूर पोलिसांनी पंच, वजनकाटाधारक आणि फोटोग्राफरसह महादेव दोंदवाडा गावाजवळ वाहने उभी केली. तिथून सुमारे २ कि.मी.चा रस्ता शेतातून आणि नाल्यातून पायी पार करून पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्याचे पाहताच परिसरात खळबळ उडाली. शेतात हजर असलेल्या राशा पावरा याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने ती शेतजमीन स्वतःची असल्याचे मान्य केले.
जप्त केलेला मुद्देमाल
प्रकार: फुले व बोंडे असलेली गांजाची झाडे
एकूण वजन: ८२० किलो
बाजारभाव: ५,००० रुपये प्रति किलो
एकूण किंमत: ४१,००,००० (४१ लाख) रुपये
पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी
या घटनेचे गांभीर्य ओळखून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. आरोपीविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात ‘गुंगीकारक औषधे द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५’ (NDPS Act) च्या कलम ८ (ब) (क), २० (अ) (ब) आणि २५ प्रमाणे गुन्हा (गुरनं. ३२/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई सुनील वसावे आणि त्यांच्या पथकाने (संतोष पाटील, जाकीरोद्दीन शेख, जगन्नाथ कोळी, राजू ढिसले, विजय ढिवरे, स्वप्नील बांगर, दिनकर पवार, वाला पुरोहित, अल्ताफ बेग, इसरार फारुकी) केली आहे.












