धुळे:शहरातील पश्चिम देवपूर भागात एका गर्भवती महिलेची मंगलपोत हिसकावून पळ काढणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून अटक केली आहे. आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र जखमी अवस्थेतही पोलिसांनी धाडस दाखवत त्यांना बेड्या ठोकल्या.

नेमकी घटना काय?
पश्चिम देवपूर भागातील एक गर्भवती महिला आपल्या मुलीला ट्यूशनवरून घरी घेऊन जात असताना, काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गर्भावस्थेचा कोणताही विचार न करता गळ्यातील मंगलपोत हिसकावली. यावेळी चोरट्यांनी महिलेला जोराचा धक्का दिल्याने त्या खाली पडल्या. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात होता.
पोलिसांचे ‘चक्रव्यूह’ आणि थरारक पाठलाग
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी तात्काळ पथके रवाना केली. शहराचे सर्व बाहेर जाणारे रस्ते ब्लॉक करण्यात आले. तपासादरम्यान गांधी पुतळा परिसरात वर्णनाप्रमाणे दोन संशयित पल्सरवर वेगाने जाताना दिसले. पोलिसांनी पाठलाग सुरू करताच आरोपींनी वाखारकर नगर आणि भगामोहन नगरच्या दिशेने धूम ठोकली.
पोलीस कर्मचारी हर्षल चौधरी आणि राहुल गिरी यांनी समोरून आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी आपली दुचाकी थेट पोलिसांच्या गाडीवर आदळली. यात दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी झाले, तरीही त्यांनी एका आरोपीला जागीच पकडले. दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळत असताना पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
अटकेतील आरोपी आणि मुद्देमाल
१) संजू मुकेश शर्मा (२८, रा. पानिपत, हरियाणा)
२) नितीन कुमार किसन कुमार (२४, रा. सामली, उत्तर प्रदेश)
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत ३,१९,०००/- रुपये):
- १.३० लाख रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत (१७.५ ग्रॅम).
- गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल (जी कोपरखैरणे, नवी मुंबई येथून चोरी केलेली होती).
- मोटोरोला आणि ओप्पो कंपनीचे मोबाईल, जॅकेट, हेल्मेट व इतर साहित्य.
आरोपींचा गुन्हेगारी इतिहास
पकडलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर हरियाणा आणि उत्तर प्रदेशात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी नितीन कुमार याला रेल्वे पोलिसांच्या एका दरोड्याच्या गुन्ह्यात ६ वर्षांची शिक्षा झाली होती आणि तो २०२५ मध्येच जेलमधून बाहेर आला होता.
ही कामगिरी कोणाची?
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोसई अमरजित मोरे, प्रशांत चौधरी, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, चेतन बोरसे, धर्मेंद्र मोहिते, हर्षल चौधरी, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, सुशिल शेंडे आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे मनोज साठे, किरण साळवे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.












