दोंडाईचा : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाबाबत अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहे. रात्री १० वाजेनंतर लाऊडस्पीकर, डी.जे. किंवा मोठ्या आवाजात संगीत वाजवल्यास संबंधित आयोजक आणि डी.जे. मालकांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी दिला आहे.
सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून दहावीच्या परीक्षाही तोंडावर आहेत. विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असताना शहरात आणि ग्रामीण भागात धार्मिक सप्ताह, लग्नसोहळे व इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या आवाजाचा फटका केवळ विद्यार्थ्यांनाच नाही, तर वृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांनाही बसत आहे.
कायदेशीर कारवाईचा इशारा
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनानुसार, दोंडाईचा पोलिसांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी कडक केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे नोंदवले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
”विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.”
— दिनेश सोनवणे (पोलीस निरीक्षक, दोंडाईचा)












