धुळे : ‘खाकी’ वर्दीतील माणुसकी आणि कर्तव्याची प्रचिती पुन्हा एकदा धुळेकरांना आली आहे. बसस्थानक परिसरात रिक्षेत विसरलेली ६० हजार रुपयांची रोकड धुळे शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात शोधून काढून मूळ मालकाकडे सुपूर्द केली. या प्रामाणिक कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय…?
मिळालेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिरपूर तालुक्यातील एक प्रवासी काही कामासाठी धुळे शहरात आले होते. बसस्थानक परिसरातून प्रवास करताना, घाईगडबडीत त्यांची ६० हजार रुपये रोख असलेली बॅग रिक्षामध्येच विसरली. बॅग रिक्षेत राहिल्याचे लक्षात येताच प्रवाशाने तत्काळ धुळे शहर पोलीस स्टेशन गाठून आपली आपबिती सांगितली.

असा लागला शोध
पोलीस निरीक्षक श्री. दीपक पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवली. या कारवाईत यांनी भूमिका बजावली:ASI ज्ञानेश्वर साळुंखे योगेश ठाकूर या पथकाने परिसरातील CCTV फुटेजची बारकाईने तपासणी केली. फुटेज आणि मानवी कौशल्याचा (Human Intelligence) वापर करून पोलिसांनी संबंधित रिक्षाचा शोध लावला. रिक्षाचालकाकडे चौकशी केली असता ती बॅग सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले.मालकाला मिळाले पैसे परत
पोलिसांनी ती रक्कम रीतसर जप्त करून पडताळणीअंती मूळ मालकाला सन्मानाने परत केली. कष्टाचे पैसे परत मिळाल्याने शिरपूरच्या प्रवाशाने पोलिसांचे डोळे भरून आभार मानले.”नागरिकांनी प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, मात्र काही अनुचित घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून वेळेवर मदत करता येईल.”
— धुळे शहर पोलीस प्रशासन












