जैवविविधतेचे जतन साठी सोबत काम करूया – मिना भोसले
धुळे :महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर यांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्थेची जैवविविधता संवर्धन प्रकल्पासाठी कार्यान्वीन यंत्रणा म्हणून निवड झाली आहे. देवराई व जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असून, यात स्थानिकांसह विविध सामाजिक संघटना, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात येणार आहे. वनसंवर्धनासाठी सर्वांनी सोबत यावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा मिना भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात मिना भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधाला. त्यांनी या प्रकल्पाबाबत माहिती देतांना सांगितले की, या प्रकल्पातंर्गत पवित्र वने (देवराई) आणि त्यांचे महत्त्व याबाबत जनजागृती केली जाणार आहे. देवराई हा प्रकल्प पुढील तीन वर्षे राबविण्यात येणार असून यासाठी संस्थेला शासनाकडून 29 लाखांचा निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार आहे. लळींग ते बारीपाडा या परिसरातील डोंगररांगांच्या आजुबाजुच्या गावांतील नागरिकांच्या सहकार्याने वनसंवर्धन, वनस्वच्छता आणि वने, वृक्षांची माहिती संकलन हे उपक्रम राबवले जातील. यासाठी विविध स्पर्धा, कार्यशाळा, जनजागृती रॅली, पथनाट्य, व्याख्याने आणि स्वच्छता मोहीम यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी आमच्या संस्थेने दहा गावे दत्तक घेतली असून या प्रकल्पाची सुरुवात सप्तशृंगी महिला संस्थेने पद्मश्री पुरस्कार विजेते चैत्राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारीपाडा येथे दि. 11 फेब्रुवारी रोजी पहिली कार्यशाळा घेवुन केली. या कार्यशाळेत शंभर बचत गटांच्या महिलांनी सहभाग घेतला आणि देवराई संवर्धनाची शपथ घेतली. यावेळी चैत्राम पवार, मिना भोसले, संगीता चौरे, अॅड.आर.बी.जाधव आणि अॅड. अनिल जगताप यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर किल्ले लळींग संवर्धन समिती, मी धुळेकर संघटना, लळींग प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य, स्वच्छता मोहीम आणि व्याख्यानांच्या माध्यमातून योगदान दिले. दरम्यान हा प्रकल्प राबविल्यानंतर प्रत्यक्ष देवराई निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. देवराई म्हणजे त्यात वड, पिंपळ, औंदुंबर, आंबा, आवळा अशी झाडे लावून ती जगविणे. तसेच धुळे जिल्ह्यातील देवराईंची माहिती संकलित करून, जैवविविधता संरक्षणासाठी धोरणात्मक योजना आखण्याचा मानस आहे. सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या या उपक्रमामुळे स्थानिक महिला, वनप्रेमींना पर्यावरण रक्षणाच्या कार्यात पुढाकार घेण्याची संधी मिळणार आहे. जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन हे भविष्यातील पिढ्यांसाठी आवश्यक आहे, त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही यावेळी संस्थेतर्फे करण्यात आले.
