धुळे : धुळे शहराच्या विकासाचा वारू वेगाने दौडत असून, प्रभाग क्रमांक ९ मधील अजबे नगर ते शिवनेरी नगर दरम्यानच्या रस्ते काँक्रिटीकरण आणि नवीन पथदिव्यांच्या कामाचा शुभारंभ रविवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला. आमदार अनुप अग्रवाल यांच्या विशेष प्रयत्नातून आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून या भागासाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधींचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
गेल्या अनेक दिवसांपासून अजबे नगर ते शिवनेरी नगर परिसरातील नागरिकांना खराब रस्ते आणि अंधाराचा सामना करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर, नगरसेवक दिनेश पोतदार आणि नगरसेविका लताबाई यशवंत सोनार यांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे निधीची मागणी केली होती. आमदारांच्या पाठपुराव्यामुळे या भागात रस्ता काँक्रिटीकरण आणि नवीन इलेक्ट्रिक पोलसह पथदिवे बसवण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली.
दिग्गजांची उपस्थिती
या विकासकामांचे उद्घाटन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते आणि महापौर मायादेवी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार अग्रवाल म्हणाले की, “शहरातील प्रत्येक वॉर्डाचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे ध्येय आहे. मूलभूत सुविधांपासून कोणीही वंचित राहणार नाही याची आम्ही दखल घेत आहोत.”
उपस्थित मान्यवर व नागरिक
कार्यक्रमाला नगरसेवक दिनेश पोतदार, नगरसेविका लताबाई यशवंत सोनार, पुनम शिरसाट, संजय जाधव, प्रदीप बैरागी, माजी नगरसेविका योगिता बागुल यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व अजबे नगर, शिवनेरी नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकासकामे मार्गी लागल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.













