धुळे: लग्नासाठी मुलगी शोधत असलेल्या तरुणांना हेरून त्यांना लग्नाचे खोटे आमिष दाखवून लुटणारी एक मोठी टोळी खान्देशात सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. धुळे तालुक्यातील फागणे येथील एका तरुणाला अशाच प्रकारे लग्नाच्या जाळ्यात ओढून तब्बल ३ लाख २५ हजार रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन नवरीसह मध्यस्थांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?
फागणे येथील रहिवासी जितेंद्र रमेश पाटील हे सेंट्रींग कामगार म्हणून काम करतात. लग्नाचे वय झाल्याने त्यांचे कुटुंबीय मुलीच्या शोधात होते. यादरम्यान त्यांची ओळख शहादा येथील ज्योती चुनिलाल निकम हिच्याशी झाली. ज्योतीने लग्नाचे आमिष दाखवून जितेंद्रकडून वेळोवेळी फोन पे द्वारे ७८ हजार रुपये उकळले.
दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी, ज्योती निकम ही इतर साथीदारांसह एका खाजगी गाडीने (GJ 15 AD 9974) फागणे येथे मुलगी दाखवण्यासाठी आली. लग्नाच्या बदल्यात २ लाख २० हजार रुपये आणि प्रवासाचा खर्च २० हजार, अशी एकूण २ लाख ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. जितेंद्र यांनी नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन ही रक्कम आरोपींच्या स्वाधीन केली.
मध्यरात्री नवरीचा पोबारा
१९ तारखेला ‘खोटे’ लग्न लावून दिल्यानंतर सर्वजण जेवण करून निघून गेले. मात्र, २० फेब्रुवारीच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास, नवरी म्हणून आलेली सरिता पवार आणि तिची सोबती रिना वळवी यांनी बाथरूमला जाण्याचे निमित्त केले. त्यांनी बाहेरून दरवाजाची कडी लावून घरून पलायन केले. जाताना त्यांनी घरातील ८५ हजार रुपये रोख आणि ६ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लंपास केली.
टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता
सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर पीडित तरुणाने मध्यस्थ ज्योती निकम हिच्याशी संपर्क साधला असता, तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जितेंद्र पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणात ज्योती निकम, चुनिलाल निकम, सागर गवळी, सरिता पवार, रिना वळवी, अर्चना पाटील यांच्यासह अन्य दोन जणांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.
“सदर टोळी ही सराईत (Habitual) असून त्यांनी यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकांना लुटल्याचा संशय व्यक्त होत आहे. माझ्याकडे या सर्व व्यवहाराचे व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि फोटो पुरावे म्हणून उपलब्ध आहेत,” असे फिर्यादी जितेंद्र पाटील यांनी सांगितले.

धुळे तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, नागरिकांनी अशा प्रकारे लग्नाचे आमिष दाखवणाऱ्या एजंटांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.











