दोषींवर गुन्हे दाखल करण्याची ॲड. मयूर बैसाणे यांची मागणी
धुळे |
शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा कणा असलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाने आता गंभीर वळण घेतले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने ओढवलेल्या आर्थिक विवंचनेतून एका हतबल कर्मचाऱ्याने आज टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण धुळे शहरात खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा आणि हक्काचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नेमकी घटना काय?
धुळे महानगरपालिकेअंतर्गत घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन थकीत आहे. यामुळे दैनंदिन घरखर्च चालवणे आणि बँकांचे कर्जाचे हप्ते फेडणे कर्मचाऱ्यांना अशक्य झाले आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने, आर्थिक विवंचनेत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आज अचानक आत्महत्येचा प्रयत्न केला.
संबंधित कर्मचाऱ्याला तातडीने धुळे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे समजते. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असून संपूर्ण कर्मचारी वर्ग हॉस्पिटलबाहेर जमा झाला आहे.

कुटुंबावर उपासमारीची वेळ
पगार नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. “कर्जाचे हप्ते थकल्याने वसुलीसाठी तगादा लावला जात आहे, मुलांच्या शाळांची फी आणि औषधोपचारासाठीही पैसे नाहीत,” अशी आर्त हाक कर्मचाऱ्यांनी दिली आहे. या तणावातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
ॲड. मयूर बैसाणे आक्रमक
या घटनेची माहिती मिळताच प्रसिद्ध वकील ॲड. मयूर बोरसे यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी या प्रकाराला प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
”हा प्रकार अत्यंत गंभीर असून एका कष्टकरी कर्मचाऱ्याला मरणाच्या दारात ढकलणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. केवळ आश्वासने नकोत, तर कर्मचाऱ्यांच्या खात्यात तातडीने पगार जमा व्हावा,” अशी मागणी ॲड. बैसाणे यांनी केली आहे.
प्रशासकीय चुप्पी
एककीडे शहर स्वच्छतेचा दावा करणाऱ्या प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत. या घटनेनंतर आता तरी महापालिका प्रशासन जागे होणार का? आणि संबंधित कर्मचाऱ्याला न्याय मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










