निजामपूर (धुळे): सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस प्रा.ली. कंपनीच्या टॉवरमधील कॉपर केबल चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात निजामपूर पोलिसांना यश आले आहे. खोरी गावाच्या शिवारात झालेल्या या धाडसी चोरीचा छडा लावत पोलिसांनी ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास खोरी गावच्या शिवारात असलेल्या सुझलॉन कंपनीच्या टॉवर क्रमांक के-३२ मधून ७८,००० रुपये किमतीची कॉपर केबल वायर चोरीला गेली होती. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३१० (२) व ११५ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना बेड्या
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय बातमीदार आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले:
१) ब्रिजेश मनिष व्दिवेदी (वय २०, रा. सीतापूर, उत्तर प्रदेश)
२) ज्ञानेश्वर झुलाल पिंपळे (भिल) (वय २५, रा. मांडळ, ता. शिंदखेडा)
तपास पथकाने आरोपींकडून ३०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे, आणि साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी एस. आर. बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकात सहभागी अधिकारी व कर्मचारी:
सपोनि मयुर भामरे, सपोनि प्रियदर्शनी थोरात, नारायण माळचे, रतन मोरे, प्रशांत ठाकूर, नागेश्वर सोनवणे, प्रदीप आखाडे, दीपक महाले, राकेश महाले, गौतम अहिरे, सागर थाटसिंगारे, कृष्णा भिल, परमेश्वर चव्हाण, सुजित देवरे, अर्जुन पवार, सागर कांगणे, टिलू पावरा, श्रीराम पदमर आणि चालक मोहन माळी.











