सनी सोनवणे
धुळे शहरात आज सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. दिवसभर सुरू असलेली मतदारांची रीघ, उमेदवारांची एका बुथवरून दुसऱ्या बुथवर सुरू असलेली धावपळ आणि कार्यकर्त्यांची लगबग यामुळे शहराचे वातावरण तापले होते. मात्र, सायंकाळी मतदानाची वेळ संपताच हा सर्व थकवा दूर करण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी थेट प्रसिद्ध ‘गजानन टी’ कडे धाव घेतल्याने तिथे मोठी गर्दी उसळली होती.

आज सकाळपासूनच शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आपला उमेदवार निवडून यावा यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करत होते, तर उमेदवारही मतदारांच्या गाठीभेटी घेत आणि बुथचा आढावा घेत पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत होते. दुपारच्या उन्हातही हा उत्साह कमी झाला नाही. या धावपळीत अनेकांना जेवणाचीही फुरसत मिळाली नाही.
सायंकाळी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर, दिवसभराचा शीण घालवण्यासाठी सर्वांची पावले आपसूकच ‘गजानन टी’ कडे वळली. काही क्षणातच तिथे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची एकच गर्दी जमली. राजकारण्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या या गर्दीमुळे परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.
चहाच्या वाफा आणि निकालाची गणिते!
‘गजानन टी’च्या गरमागरम चहाचा घोट घेत कार्यकर्त्यांचा थकवा तर दूर झालाच, पण तिथेच निकालाची गणितेही मांडली जाऊ लागली. दिवसभर एकमेकांविरुद्ध प्रचार करणारे कार्यकर्ते चहाच्या टपरीवर मात्र खेळीमेळीने गप्पा मारताना दिसले. “आजचा दिवस कष्टाचा होता, पण गजाननच्या चहाने तरतरी आणली,” अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.













