धुळे: कॉलेज विश्वातील मैत्री आणि प्रेमाची रंजक सफर घडवून आणणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘जब्राट’ येत्या ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत दिग्दर्शिका प्रगती कोळगे यांनी चित्रपटाबद्दल सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे, या चित्रपटाद्वारे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर-जैताणे येथील नवोदित गायक अनुराग जगदाळे याला पार्श्वगायनाची मोठी संधी देण्यात आली आहे.

संघर्षातून स्वरांचा प्रवास
गायक अनुराग जगदाळे हा झेड. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. लहानपणीच मातृछत्र हरपल्यानंतरही त्याने जिद्दीने संगीत क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. शालेय शिक्षणासोबतच वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने ‘संगीत विशारद’ ही पदवी प्रथम श्रेणीत मिळवली. ‘सारेगम’ आणि ‘संगीत सम्राट’ यांसारख्या मोठ्या मंचावर ऑडिशन्स दिलेल्या अनुरागच्या प्रतिभेची दखल घेत दिग्दर्शिका प्रगती कोळगे यांनी त्याला या चित्रपटात गाण्याची संधी दिली.

दिग्गज गायकांची साथ
चित्रपटाचे संगीत डॉ. जयभीम शिंदे यांनी दिले असून, चित्रपटात अनुरागसोबतच बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे आणि नंदिश उमप यांसारख्या नामांकित गायकांचे स्वर ऐकायला मिळणार आहेत. अनिलकुमार अरोडा हे कार्यकारी निर्माते तर गोविंद मोदी हे सहनिर्माते आहेत.
तरुण कलाकारांची फौज
‘जब्राट’मध्ये अभिनेता आयुष संजीव आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे ही जोडी रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. यासोबतच वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, हिंदवी पाटील या तरुण कलाकारांसह संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर आणि गणेश यादव यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.










