धुळे: वडिलांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि त्यांना अटक न करण्यासाठी ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती २ लाख रुपये स्वीकारताना शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशनच्या एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या प्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
तक्रारदार हे शिरपूर तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांविरुद्ध १८ ऑक्टोबर २०२३ रोजी थाळनेर पोलीस स्टेशनमध्ये अमली पदार्थ विरोधी अधिनियमान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात वडिलांना अटक न करण्यासाठी थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार भूषण रामोळे, पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे, किरण सोनवणे आणि मुकेश पावरा यांनी ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने यासंदर्भात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. ८ जानेवारी २०२६ रोजी पडताळणी केली असता, या चौघांनी मिळून तडजोडीअंती २ लाख रुपये घेण्याचे मान्य केले.
एसीबीचा सापळा आणि कारवाई
आज, १२ जानेवारी २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने थाळनेर येथे सापळा रचला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा याने तक्रारदाराकडून लाचेची २ लाख रुपयांची रक्कम स्वतः स्वीकारली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.
आरोपींची नावे:
१. मुकेश गिलदार पावरा (पोलीस कॉन्स्टेबल, ब.नं. १५९३) २. भूषण यशपाल रामोळे (पोलीस हवालदार, ब.नं. ०७) ३. धनराज वचन मालचे (पोलीस कॉन्स्टेबल, ब.नं. १४५८) ४. किरण सखाराम सोनवणे (पोलीस कॉन्स्टेबल, ब.नं. १६९६) (सर्व नेमणूक: थाळनेर पोलीस स्टेशन)
तपास आणि पथक
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, यशवंत बोरसे आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.












