
धुळे : प्रभाग १० मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ कुमारनगरमध्ये भव्य सभा; विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याची आमदार अनुप अग्रवाल यांची टीका
धुळे: “केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीचे सरकार असल्याने गेल्या पाच वर्षांत धुळे शहराच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे.
हा विकासाचा वारू असाच पुढे नेण्यासाठी आणि ‘विकसित धुळ्याचे’ स्वप्न साकारण्यासाठी महापालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
धुळे महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग १० मधील भाजपचे अधिकृत उमेदवार सुनील तुळशीराम बैसाणे, प्रतिभा अनिल पाटील, किरण राकेश कुलेवार आणि ललित वीरभान अरुजा यांच्या प्रचारार्थ कुमारनगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही
पालकमंत्री रावल पुढे म्हणाले की, “आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शहरात पाणीटंचाई आणि गटारींचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कोट्यवधींचा निधी आणला. १७० कोटींच्या निधीतून व्यापारी संकुलांचे काम सुरू असून रावेर एमआयडीसीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी धुळ्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे १५ जानेवारीला भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा.”
विरोधक हतबल झाले आहेत : आमदार अनुप अग्रवाल
यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “भाजपकडे शहरासाठी स्पष्ट विकास धोरण आहे. अमृत योजनेतून भूमिगत गटार योजना, १८ डीपी रस्ते आणि दसेरा मैदान, पाचकंदील, संत सावता माळी मार्केट यांसारखी मोठी कामे आपण मार्गी लावली आहेत. या कामांमुळे विरोधक हतबल झाले असून त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे उरलेले नाहीत. म्हणूनच ते आता जातीवादाचे खोटे आरोप करत आहेत.”
सभेला मतदारांचा उदंड प्रतिसाद
या सभेला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन, कशीश उदासी यांच्यासह सिंधी समाजाचे पदाधिकारी आणि प्रभाग १० मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळ्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुन्हा एकदा कमळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.












