धुळे: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. शनिवारी मध्यरात्री धुळे-पारोळा रोडवरील मुकटी शिवारात पोलिसांनी सापळा रचून मद्य तस्करांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत पोलिसांनी ३० लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना अटक केली आहे.
गुप्त माहितीवरून रचला सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पाटील यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, पारोळ्याकडून धुळ्याकडे येणाऱ्या एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात देशी दारूची तस्करी केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुकटी गावाच्या शिवारातील हॉटेल ‘एकता’च्या परिसरात पाळत ठेवली.

अंधाराचा फायदा घेऊन सुरू होती मालाची ने-आण
मध्यरात्री १:०० ते २:३६ च्या दरम्यान, संशयित ट्रक (MH 18 BA 8891) हॉटेलच्या आवारात उभा होता. अंधाराचा फायदा घेऊन ट्रकमधील दारूचे बॉक्स एका पिकअप वाहनात भरले जात असताना पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेतले: १) राकेश छगनलाल जैन (वय ३५, रा. शांतीनगर, धुळे) २) दिपक अशोक शिंदे (वय ३५, रा. नत्थूबाबा नगर, मोहाडी, धुळे) ३) सुदाम भुरा गोसावी (वय ४२, रा. शिरपूर)
मोठा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण ३०,१७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये प्रामुख्याने यांचा समावेश आहे:
मद्यसाठा: ‘रॉकेट’ ब्रँडच्या देशी दारूचे एकूण १५४ बॉक्स (ज्याची किंमत ५ लाख १२ हजार रुपये आहे).
वाहने: एक आयशर ट्रक, एक पिकअप वाहन आणि एक स्विफ्ट डिझायर कार.
इतर: आरोपींचे ४ मोबाईल फोन.
गुन्हा दाखल
या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात ‘महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९’ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, पीएसआय प्रशांत राठोड आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली असून, वरिष्ठांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.












