आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थितीत आनंद लोंढे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न; भाजप उमेदवारांवर सडकून टीका
धुळे : वॉर्ड क्रमांक १० मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आनंद लोंढे व इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. “भाजपच्या उमेदवारांनी या परिसरात केवळ अवैध धंदे आणि व्यसनाधीनता पसरवली असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी अशा गुंड प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे,” असा घणाघात शिवसेना नेते संजय वाल्हे यांनी यावेळी केला.

या सभेला प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार मंजुळा गावित उपस्थित होत्या. त्यांच्यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी आणि परिसरातील महिलांची मोठी उपस्थिती लाभली होती.
’अवैध धंदे आणि गुंडशाही’ हाच भाजपचा विकास: संजय वाल्हे
सभेत बोलताना संजय वाल्हे यांनी भाजप उमेदवारांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, “भाजपचे उमेदवार कोणाच्याही सुखा-दुःखात कधीच धावून आले नाहीत, त्यांना स्थानिक जनता ओळखतही नाही. त्यांनी केवळ तरुणाईला दारूच्या आहारी लावले असून चौकाचौकात गुंड टोळ्या उभ्या केल्या आहेत. अशा वातावरणात आपल्या माता-भगिनी कशा सुरक्षित राहणार? पैशाच्या जोरावर राजकारण करू पाहणाऱ्यांना या निवडणुकीत त्यांची औकात दाखवा.” भाजपला एकाच गल्लीत प्रचारासाठी चार-चार वेळा चकरा माराव्या लागत आहेत, हीच त्यांच्या पराभवाची चिन्हे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

धर्माच्या नावावर मतांचा जोगवा: आनंद लोंढे
उमेदवार आनंद लोंढे यांनी भाजपच्या ‘विकास’ दाव्यांची पोलखोल केली. “भाजपकडे विकासाचा कोणताही मुद्दा शिल्लक नसल्याने ते आता धर्माच्या नावावर मतांचा जोगवा मागत आहेत. स्थानिक नागरिक त्यांना नाकारत असून ठिकठिकाणी भाजपला विरोध होत आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी आणि भाजपची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी यंदा शिवसेनेला विजयी करा,” असे आवाहन लोंढे यांनी केले.

लाडक्या बहिणींचा शिवसेनेवर विश्वास
आमदार मंजुळा गावित यांनी शासनाच्या विविध योजनांचा संदर्भ देत, शिवसेना उमेदवार सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहतील अशी ग्वाही दिली. “तुमच्या सुखा-दुःखात धावून येणारा उमेदवार निवडून देणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित महिलांनी मोठ्या संख्येने हात उंचावून वॉर्ड १० मध्ये शिवसेनेलाच मतदान करण्याचे आश्वासन दिले.
या सभेमुळे वॉर्ड १० मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेनेने भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.












