ज्येष्ठ विधीज्ञांच्या उपस्थितीत प्रस्ताव सादर
धुळे (प्रतिनिधी): धुळे महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी (Nominated Member) ॲड. मयुर मेघराज बैसाणे यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे स्वीकृत सदस्य पदासाठी थेट प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करणारा हा उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच अर्ज असल्याचे मानले जात आहे. यावेळी ज्येष्ठ वकील मधुकर भिसे यांच्यासह वकील संघाचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१२ च्या कलम ५ अन्वये ॲड. बैसाणे यांनी हा प्रस्ताव उपायुक्तांकडे सादर केला. या नियमातील कलम ४ (ड) नुसार, विधी क्षेत्रात पाच वर्षांपेक्षा अधिक अनुभव असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तीची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्याची तरतूद आहे. याच कायदेशीर बाबींचा आधार घेत ॲड. बैसाणे यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.

बुद्धीजीवी वर्गाला संधी देण्याची मागणी
केवळ राजकीय पक्षांचे तौलनिक संख्याबळ न पाहता, नियमातील तरतुदीनुसार डॉक्टर, वकील, प्राध्यापक अशा बुद्धीजीवी वर्गातून प्रतिनिधी निवडण्याचे विशेष अधिकार आयुक्तांना आहेत. शहराच्या विकासासाठी आणि सभागृहातील चर्चा कायदेशीर व अभ्यासपूर्ण होण्यासाठी अशा नियुक्त्या होणे गरजेचे असल्याचे ॲड. बैसाणे यांनी अर्जात नमूद केले आहे.
सामाजिक व विधी क्षेत्रातील योगदान
ॲड. मयुर बैसाणे हे गेल्या पाच वर्षांपासून वकिली व्यवसायात असून पर्यावरण संवर्धन, रक्तदान शिबिरे आणि क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. तसेच महिलांवरील अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत धुळे जिल्हा वकील संघ, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, तसेच डॉक्टरांची संघटना ‘आयएमए’, जिल्हा पत्रकार संघ आणि प्राध्यापक संघटनेने त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.
प्रस्ताव दाखल करतेवेळी ॲड. मयुर बैसाणे यांनी सांगितले की, “माझी निवड झाल्यास धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहीन. महापालिकेच्या योजना कायदेशीर चौकटीत राहून राबवण्यासाठी आणि प्रशासनाला कायदेशीर सल्ला देण्यासाठी माझ्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल.”
या प्रसंगी ज्येष्ठ वकील मधुकर भिसे यांच्यासह शहरातील अनेक नामवंत वकील आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.












