धुळे:त्याग मूर्ती माता रमाई यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त धुळे शहरात आयोजित भव्य ‘भीम गीतांचा कार्यक्रम’ आणि प्रबोधन सोहळा हजारो भीम अनुयायांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी ११ किलोचा केक कापून आणि ‘जय भीम’चा जयघोष करत मातेच्या जयंतीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी पार पडलेल्या या सोहळ्याचे मुख्य आकर्षण इंडियन स्कॉलर आणि प्रख्यात गायक, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी सन्मानित बुद्धाचार्य प्रा.डॉ. पंडित घनश्याम थोरात हे होते. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात सादर केलेल्या भीम गीतांनी आणि मर्मभेदी प्रबोधनाने उपस्थित जनसमुदायाची मने जिंकली.

माता रमाईंच्या त्यागाला उजाळा
प्रा.डॉ. पंडित घनश्याम थोरात यांनी माता रमाई यांच्या जीवनावर आणि महान त्यागावर आधारित सुश्राव्य गीते सादर केली. त्यांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या गायनाने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत आणि यशात माता रमाईंचा सिंहाचा वाटा होता, यावर त्यांनी आपल्या प्रबोधनातून प्रकाश टाकला.

मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून धुळे शहर पोलीस निरीक्षक मा. दीपक पाटील, नगरसेवक मा. नागसेनभाऊ बोरसे, मा. प्रदीपभाऊ बैरागी आणि मा. कृपेशभाऊ नांद्रे उपस्थित होते. तसेच मा. अल्फाभाभी अग्रवाल, मा. कल्याणीताई अंपळकर यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि समाजसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आयोजकांचे परिश्रम
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. नयनाताई दामोदर, सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकरअण्णा खरात, बापू बागुल (दक्ष पत्रकार संघ), अमोलभाऊ जाधव, बबलुभाऊ रामराजे आणि अनमोलभाऊ दामोदर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला धुळे शहरातील नागरिक आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













