२३ फेब्रुवारीला १५० व्या जयंतीदिनी होणार भूमिपूजन; धोबी समाजाच्या बैठकीत निर्णय
धुळे : गेल्या १० ते १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि समाजबांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गाडगे बाबांच्या स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगे बाबांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून सकाळी ११ वाजता धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ स्मारकाचे भूमिपूजन थाटात संपन्न होणार आहे. मराठा, परदेशी आणि तेलगू धोबी समाजाचे अध्यक्ष व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रदेश युवा अध्यक्ष (धोबी समाज) संजय वाल्हे यांनी दिली.

प्रलंबित प्रश्नाला अखेर न्याय
धुळे शहरात संत गाडगे बाबांचे स्मारक उभारावे, ही मागणी संजय वाल्हे नगरसेवक असल्यापासून धोबी समाजाच्या वतीने सातत्याने केली जात होती. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालिकेच्या सभागृहात पुतळा बसविण्याचा ठराव मंजूर करून घेतला होता. मात्र, तांत्रिक कारणास्तव हे काम रखडले होते.
अलीकडेच राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन आयुक्त अमिता दगडे-पाटील यांना स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला. ४ फेब्रुवारी रोजी शहर अभियंता चंद्रकांत ओगले यांनी ठेकेदाराला प्रत्यक्ष कामाची ‘लाईन आऊट’ दिली असून आता कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे.
सुंदर डिझाईन आणि भव्य पुतळा
या स्मारकासाठी वास्तुविशारद (आर्किटेक्ट) योगेश ठाकरे यांनी स्मारकाचे अत्यंत देखणे डिझाईन तयार केले आहे. तसेच, शिल्पकार सरमत पाटील यांनी संत गाडगे बाबांचा सुबक पुतळा साकारला आहे. शासनाच्या सर्व आवश्यक परवानग्या मिळाल असून ठेकेदाराला कार्यादेशही देण्यात आला आहे.
दिग्गजांच्या उपस्थितीत होणार सोहळा
दि. ५ फेब्रुवारी रोजी धोबी समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भूमिपूजन सोहळ्याचे नियोजन करण्यात आले. हा सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार सौ. मंजुळाताई गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार काशीराम पावरा, आमदार राम भदाणे, महापौर आणि सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
बैठकीला यांची होती उपस्थिती
या नियोजनाच्या बैठकीला संजय वाल्हे, पंडित जगदाळे, दिलीप आप्पा गवळी, अनिल काकूळदे, भोला सगरे, सुरेश कोडगीर, अमोल गायकवाड, सुनील खैरनार, गणेश परदेशी, कृष्णा शिंदे, संजय गवळी, सागर कोडगीर, संजय टोपे, राहुल काळे, जितेंद्र चव्हाण, विलास परदेशी, विनोद परदेशी, अजय जगदाळे, शुभम जगदाळे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.












