’परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद; कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन सज्ज
धुळे :दहावी आणि बारावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचे वर्ष मानले जाते. मात्र, या परीक्षेचे दडपण न घेता विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले. तसेच पालकांनी आपल्या पाल्याच्या क्षमतेनुसार त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शुक्रवारी (दि. ६) ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनीष पवार यांच्यासह जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकस आहार आणि अभ्यासाचे नियोजन
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी विसपुते म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करून प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा. प्रश्नपत्रिका हातात आल्यावर आधी सोपे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा. परीक्षेचा काळ महत्त्वाचा असल्याने विद्यार्थ्यांनी या काळात सकस आहार घ्यावा आणि आरोग्याची काळजी घ्यावी. काही अडचण किंवा ताण जाणवल्यास त्वरित पालकांशी किंवा शिक्षकांशी संवाद साधावा. दहावी-बारावीनंतर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून त्याची माहितीही विद्यार्थ्यांनी घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख यांनी प्रशासकीय तयारीची माहिती दिली. ते म्हणाले की, “जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त परीक्षा’ अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, तेथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. कॉपीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन सज्ज असून, गैरप्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.”
कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन केले.












