एलईडी सोलर स्ट्रीटलाईटच्या कामाचे बिल काढण्यासाठी मागितली होती लाच
धुळे: नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (विद्युत) उपअभियंत्याला तब्बल ८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. नितीन दत्तात्रय इंगळे (वय ५३, रा. उप अभियंता, विद्युत उपविभाग, सा.बां. विभाग, नंदुरबार) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय..?
तक्रारदार हे शासकीय विद्युत कंत्राटदार आहेत. त्यांच्या फर्मला शासनाच्या विद्युत कामाचे कंत्राट मिळाले होते. या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील २८ गावांमध्ये/ पाड्यात ‘एलईडी सोलर स्ट्रीटलाईट’ बसविण्याचे काम मंजूर झाले होते. जीएसटी वगळता या कामाची एकूण किंमत २ कोटी ३७ लाख २९ हजार ३५६ रुपये इतकी होती. हे काम मुदतीत पूर्ण झाल्यानंतर, मार्च २०२५ मध्ये ४९ लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये उर्वरित २ कोटी २ लाख ५ हजार ५२५ रुपयांचे बिल तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा झाले. मात्र, हे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून आणि पुढील कामांच्या बिलांवर सह्या करण्यासाठी उपअभियंता नितीन इंगळे यांनी पैशांची मागणी केली.
तडजोडीअंती ८ लाख ठरले
इंगळे यांनी सुरुवातीला ८ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे दिल्याशिवाय पुढील कामांच्या बिलांवर सह्या करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यामुळे कंत्रादाराने २७ जानेवारी २०२६ रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी केली असता, इंगळे यांनी तडजोडीअंती ८ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
सापळा आणि अटक
त्यानुसार, आज (९ फेब्रुवारी २०२६) सापळा रचण्यात आला. नितीन इंगळे यांनी पंचांसमक्ष ८ लाख रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे आणि त्यांच्या पथकाने केली.












