निवडणूक अधिकाऱ्यांवर टाळाटाळ केल्याचा आरोप; सोशल मीडियावरील अफवांचेही केले खंडन 4 वाजेला घेतली पत्रकार परिषद
धुळे: धुळे येथील प्रभाग क्रमांक १ ब मधील निवडणूक प्रक्रिया आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रभागातील एका उमेदवाराला तीन अपत्ये असतानाही त्यांचा उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आल्याचा दावा करत, उमेदवार प्राची कुलकर्णी यांनी आपला लढा तीव्र केला आहे. “मी पैशासाठी शांत बसलेली नाही, तर माझा संघर्ष सुरूच असून मी याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे,” असा निर्धार त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक १ ब मधील एका उमेदवाराला तीन अपत्ये आहेत. निवडणूक नियमांनुसार, ठराविक मर्यादेपेक्षा जास्त अपत्ये असणारे उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतात. याच मुद्द्यावर प्राची कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी हरकत नोंदवली होती. मात्र, “हरकत घेण्याची वेळ संपली आहे,” असे कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे.

सोशल मीडियावरील अफवांचे खंडन
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्राची कुलकर्णी यांच्याबद्दल चुकीचा प्रचार केला जात होता. “कुलकर्णी यांनी पैसे घेऊन आपली तक्रार मागे घेतली आहे आणि त्या आता शांत बसल्या आहेत,” अशा आशयाच्या पोस्ट फिरत होत्या. या अफवांचा समाचार घेताना कुलकर्णी म्हणाल्या की, “माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी काही लोक चुकीचा प्रचार करत आहेत. मी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडलेली नाही. माझा लढा लोकशाहीच्या मार्गाने सुरूच आहे.”
पुढील पाऊल: न्यायालयीन लढा
निवडणूक प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचे पाहून आता प्राची कुलकर्णी यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. अपात्र उमेदवाराला निवडणूक लढवू देऊन प्रशासनाने नियमांचे उल्लंघन केले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. या पत्रकार परिषदेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता न्यायालय यावर काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












