धुळे: येथील गुरुद्वाराचे संत बाबा धीरज सिंग यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, आता या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कटाबाबत बाबांच्या मेहुण्याने पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे केले आहेत. “ही हत्या केवळ रागातून झालेली नसून, संपत्ती आणि सोन्याच्या लुटीसाठी रचलेला हा एक मोठा कट होता,” असा आरोप त्यांनी केला आहे.
हत्येचा ‘मास्टरमाइंड’ आणि मुख्य आरोपी
पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे राजस्थानमधील १० चक, रावतसर येथील सुखदेव सिंग यांची मुले रणवीर सिंग, दर्शन सिंग, रणजित सिंग आणि सुखदेव सिंग (पुत्तर शेर सिंग) यांच्यासह जगविंदर सिंग (जग्गा) आणि सुखविंदर सिंग (बग्गा) यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

संपत्तीचा हव्यास आणि धमक्या
आरोप करण्यात आला आहे की, रणवीर सिंग हा वारंवार बाबांच्या मालमत्तेवर आणि पगडीवर (गादीवर) आपला हक्क सांगत होता. “बाबांना सांगून मालमत्ता माझ्या नावे करा, अन्यथा संत साधू सिंग मोनी यांच्यासारखाच यांचाही खून होईल,” अशी धमकी रणवीर सिंगने दिल्याचे मेहुण्याने सांगितले.
करोडो रुपयांची लूट
धुळे येथून नागपूरला जाणाऱ्या ‘गुरुतेग बहादर शहीदी मार्च’साठी संघटनेने २ ते ४ कोटी रुपयांचा निधी जमा केला होता. हा निधी आणि बाबांच्या तिजोरीतील ५ ते ८ किलो सोने रणवीर सिंगने चोरी केल्याचा दावा या परिषदेत करण्यात आला आहे.
शस्त्रास्त्रांबाबत गंभीर आरोप
आरोपी रणवीर सिंग याच्याकडे पोलिसांना ४५ mm ची ३५ काडतुसे आणि ८ mm ची ८ काडतुसे सापडली आहेत. मात्र, ८ mm च्या काडतुसांसाठी लागणारे पिस्तूल अद्यापही त्याच्याकडेच लपवलेले असून, पोलिसांनी ते तातडीने जप्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आचारसंहितेचे उल्लंघन
धुळे महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना, नियमानुसार सर्व शस्त्रे आणि काडतुसे जमा करणे बंधनकारक होते. असे असतानाही रणवीर सिंगने ही शस्त्रास्त्रे लपवून ठेवून आचारसंहितेचा भंग केल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.
“माझ्या आई आणि बहिणीच्या जीवाला धोका” आरोपींपैकी एक असलेल्या जगविंदर सिंग उर्फ जग्गा याने स्वतः कबूल केले आहे की, रणवीर सिंगनेच बाबांचा खून केला असून, आता तो माझ्या आईची आणि बहिणीची देखील हत्या करू शकतो.या गंभीर आरोपांमुळे आता पोलीस तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरण्याची शक्यता असून, यातील आर्थिक गैरव्यवहार आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या कोनाचा पोलीस शोध घेत आहेत.












