धुळे | प्रतिनिधी धुळे महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज पार पडली. मात्र, या प्रक्रियेदरम्यान प्रशासकीय नियोजनाचा पूर्णपणे अभाव दिसून आला. मतमोजणी केंद्रावर झालेल्या प्रचंड गोंधळामुळे आणि अपुऱ्या सोयीसुविधांमुळे केवळ उमेदवारच नव्हे, तर कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
केंद्राबाहेर लांबच लांब रांगा
मतमोजणी केंद्रावर प्रवेश करण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. प्रशासनाने प्रवेशासाठी योग्य व्यवस्था न केल्याने उमेदवारांचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासनतास उन्हात उभे राहावे लागल्याने अनेकांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.

अधिकारी आणि उमेदवारांना मनस्ताप
नियोजनातील त्रुटींचा फटका थेट कामकाजावरही बसला. आतमध्ये बसण्याची अपुरी सोय, पिण्याच्या पाण्याची गैरसोय आणि तांत्रिक अडचणींमुळे मतमोजणी प्रक्रियेत वारंवार अडथळे येत होते. अनेक उमेदवारांनी तक्रार केली की, त्यांना मतमोजणीच्या फेऱ्यांची माहिती वेळेवर दिली जात नव्हती. दुसरीकडे, कर्मचाऱ्यांनाही ही गर्दी हाताळताना नाकीनऊ आले होते.

“प्रशासनाने मतमोजणीचे नियोजन अत्यंत सुमार दर्जाचे केले आहे. उमेदवार आणि प्रतिनिधींना गुराढोरांप्रमाणे रांगेत उभे राहावे लागत आहे. किमान मूलभूत सुविधांची अपेक्षा तरी आम्ही करू शकतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका उमेदवाराने दिली.
पोलिस प्रशासनाची कसरत
केंद्राबाहेरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. रांगा लावण्यावरून आणि ओळखपत्रांच्या तपासणीवरून अनेक ठिकाणी वादावादीचे प्रकार घडले. गर्दीमुळे केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर रेटारेटीची परिस्थिती निर्माण झाली होती.












