दोंडाईचा : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचा काल (दि.१६) वाढदिवस असतानाच धुळे महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालाने भाजपाला दणदणीत यश मिळवून देत धुळेकर जनतेने पालकमंत्री रावल यांना जणू ‘विजयी भेट’च दिली आहे.

धुळे महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी भाजपच्या वतीने मंत्री जयकुमार रावल यांच्यावर सोपविण्यात आली होती. भाजपने लढविलेल्या ६२ जागांपैकी तब्बल ५० जागांवर विजय मिळवत महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विशेष म्हणजे, हा विजय मंत्री रावल यांच्या ५० व्या वाढदिवशी ५० जागा जिंकून मिळाल्याने या निकालाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर सलग पंधरा दिवस मंत्री रावल यांनी धुळे शहरात ठाण मांडून निवडणुकीची सूत्रे हाताळली. सूक्ष्म नियोजन, प्रभावी रणनिती, प्रचारसभा, रॅली तसेच शहर व जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा समन्वय साधत त्यांनी निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आक्रमक प्रचार करत मतदारांपर्यंत थेट पोहोच साधली.

या मेहनतीला मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत भाजपाला घवघवीत यश मिळवून दिले. धुळेकर जनतेने भाजपला स्पष्ट बहुमत देत मंत्री जयकुमार रावल यांच्या वाढदिवसाला राजकीयदृष्ट्या अ संस्मरणीय बनवले आहे. ५० व्या वाढदिवसानिमित्त ५० जागांचा हा विजय भाजपसाठीच नव्हे, तर पालकमंत्री रावल यांच्या नेतृत्वासाठीही महत्त्वपूर्ण ठरला आहे.















