धुळ्यात रचला गेला नवा इतिहास; ‘वारसदार’ वादातही भाजपच्या निर्णयावर मतदारांची मोहर
सनी सोनवणे, धुळे
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा एक अनोखा इतिहास रचला गेला आहे. राजकारणात नेहमीच घराणेशाही आणि वारसदार संस्कृतीवर टीका होत असताना, धुळ्यात मात्र एकाच कुटुंबातील तीन सदस्य एकाच वेळी नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढणाऱ्या परदेशी कुटुंबाने हा बहुमान मिळवला असून, शहराच्या राजकीय वर्तुळात सध्या या विजयाची आणि महापौरपदाच्या शर्यतीची जोरदार चर्चा सुरू आहे.
तिकिटासाठी रस्सीखेच, तरीही एकाच घरात संधी
निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी प्रचंड चुरस पाहायला मिळाली. पक्षाच्या तिकिटासाठी शहरातून तब्बल ४०० ते ५०० इच्छुक रिंगणात होते. पक्षात वारसदार परंपरेला विरोध असल्याचा सूर असतानाही, भाजपने धाडसी निर्णय घेत परदेशी कुटुंबातील तीन सदस्यांना उमेदवारी दिली. हा निर्णय त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावणारा होता, परंतु निवडणूक निकालाने पक्षाचा हा निर्णय सार्थ ठरवला आहे.
तिन्ही शिलेदारांचा दणदणीत विजय
एकाच घरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तिन्ही सदस्यांनी विजय संपादन केला आहे.
- मायादेवी परदेशी: प्रभाग ११ (ब) मधून विजयी.
- चित्रलेखा परदेशी: प्रभाग १८ (अ) मधून विजयी.
- धीरज परदेशी: प्रभाग १६ (अ) मधून विजयी.
हे तिन्ही सदस्य आता धुळे महानगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून एकत्र बसणार आहेत. धुळे शहराच्या इतिहासात एकाच कुटुंबात तीन नगरसेवक असण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
महापौरपदासाठी राजकीय गणित..?
एकाच कुटुंबाला तीन तिकिटे देणे आणि त्यांचा विजय होणे, यामागे काही मोठे राजकीय गणित असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. हे केवळ योगायोग नसून, आगामी महापौरपदासाठी ही एखादी पूर्व नियोजित रणनीती असू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषक लावत आहेत.
सध्या परदेशी कुटुंबाच्या या यशाचे कौतुक होत असले तरी, सर्वांचे लक्ष आता ‘महापौरपदाचे आरक्षण’ कोणासाठी जाहीर होणार, याकडे लागले आहे. आरक्षण सोडतीनंतरच परदेशी कुटुंबातील विजयाचे खरे राजकीय वजन समजणार आहे. तोपर्यंत धुळेकरांसाठी हा विषय उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरला आहे.












