धुळे : नुकत्याच पार पडलेल्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक ९ आणि १० मधून दणदणीत मतांनी विजय मिळविलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित उमेदवारांचा साक्री रोडवरील भीमनगर येथे नुकताच समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला.

शहरातील भीमनगर येथे दिनांक १८ जानेवारी रोजी सायंकाळी हा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. माजी नगरसेवक जितेंद्र उंदा शिरसाट यांचे मार्गदर्शन आणि धनराज शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली भीमनगरातील स्थानिक युवकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक ९ मधून विजयी झालेले भाजपचे उमेदवार संजय सुधाकर जाधव, पुनम जितेंद्र शिरसाट, लताबाई सोनार, प्रदीप पुरणदास बैरागी तसेच प्रभाग क्रमांक १० मधील विजयी उमेदवार सौ. प्रतिभा अनिल पाटील आणि ललित आरूजा यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

निवडणुकीच्या काळात विजयासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल धनराज जितेंद्र शिरसाठ, दिनेश पोतदार, राहुल अग्रवाल आणि अनिल पाटील यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, सौ. कुसुमताई शिरसाट, पारस दुग्गड, किरण धिवरे, भरत बैरागी, निनाद पाटील, संजय सरदार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी भीमनगरातील आयोजक तरुण वर्ग, परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय अहिरे यांनी केले.

















