धुळे:जमिनीच्या ले-आऊट मंजुरीसाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील ३० हजार रुपये स्वीकारताना धुळे येथील सहायक नगर रचनाकार कल्पेश चौरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत सहायक आरेखक किशोर भोई आणि महसूल सहायक दीपक हटकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
तक्रारदाराने आपल्या वडिलांच्या नावे असलेल्या १०,००० चौरस मीटर शेतजमिनीवर नियोजित औद्योगिक प्रयोजनार्थ बिनशेती (NA) परवानगी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. हे प्रकरण मंजुरीसाठी नगर रचना विभागाकडे पाठवण्यात आले होते. या कामासाठी सहायक आरेखक किशोर भोई यांनी स्वतःसाठी १०,००० रुपये आणि सहायक नगर रचनाकार कल्पेश चौरे यांच्यासाठी ४०,००० रुपये अशा एकूण ५०,००० रुपये लाचेची मागणी केली होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक दीपक हटकर यांनीही शेती आदेश देण्यासाठी स्वतंत्र २०,००० रुपयांची मागणी केली होती.
असा लावला सापळा:
तक्रारदाराने याबाबत धुळे एसीबीकडे तक्रार केली. १३ जानेवारी २०२६ रोजी पडताळणी दरम्यान आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २१ जानेवारी २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी सहायक नगर रचनाकार कल्पेश चौरे यांनी तक्रारदाराकडून ३०,००० रुपये स्वीकारले असता, एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
आरोपींची नावे:
१. कल्पेश धनलाल चौरे (वय २८, सहायक नगर रचनाकार, वर्ग-२)
२. किशोर भटा भोई (वय ४३, सहायक आरेखक, नगर रचना विभाग, धुळे)
३. दीपक आनंदा हटकर (वय ४०, महसूल सहायक, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे)
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. माधव रेड्डी व श्री. सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे आणि त्यांच्या पथकाने केली












