धुळे: लक्झरी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून परराज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा धुळे तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर आर्वी पोलीस दूरक्षेत्रासमोर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यात पोलिसांनी ८ लाखांचा गुटखा आणि दीड कोटींची लक्झरी बस असा एकूण १ कोटी ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय..?
धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना दिनांक २० जानेवारी रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, इंदूर (मध्य प्रदेश) येथून श्यामली परिवहन कंपनीची लक्झरी बस (क्रमांक MP-41-ZJ-7444) पुण्याकडे येत असून, त्यात प्रतिबंधित सुगंधीत पान मसाल्याची वाहतूक होत आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उप-विभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला.

दिनांक २१ जानेवारी रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास आर्वी पोलीस दूरक्षेत्रासमोर ही बस अडवण्यात आली. बसची झडती घेतली असता, प्रवाशांच्या बॅगांच्या शेजारी काही पांढऱ्या रंगाच्या संशयास्पद गोण्या आढळून आल्या. या गोण्यांची तपासणी केली असता त्यात राजश्री पान मसाला, रजनीगंधा पानमसाला आणि आर.एम.डी. पान मसाला असा एकूण ८,१८,०८५ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य साठा आढळून आला.
गुन्हा दाखल आणि अटक
या प्रकरणी पोलीस हवालदार चेतन कंखरे यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये श्यामली परिवहन कंपनीचा मॅनेजर, मालक कमल शर्मा, प्रवीण नावाचा व्यक्ती (सर्व रा. इंदूर) यांच्यासह बसवरील कर्मचारी यांचा समावेश आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून बसचा चालक सचिन दिनेश बाडोले (वय ३१), बिरजुदास रतनदास बैरागी (वय ४८) आणि वाहक प्रदीपकुमार लक्ष्मीनारायण सुर्यवंशी (सर्व रा. इंदूर, मध्य प्रदेश) या तिघांना अटक केली आहे. या कारवाईत ८,१८,०८५ रुपयांचा गुटखा आणि १,५०,००,००० रुपये किमतीची व्होल्वो लक्झरी बस जप्त करण्यात आली आहे.
पोलिस पथकाची कामगिरी
ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मपोउनि छाया पाटील, पोहवा गणेश काळे, कुणाल पानपाटील, चेतन कंखरे, सुमित ठाकूर, विशाल पाटील, सुरेंद्र खांडेकर, निलेश पाटील, प्रमोद पाटील आणि योगेश पाटील यांच्या पथकाने केली. गुटखा तस्करांनी आता तस्करीसाठी लक्झरी बसेसचा वापर सुरू केल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे.












