धुळे: नाशिक येथील एका कार्यक्रमात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणादरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळल्याचा आरोप करत त्याचे तीव्र पडसाद धुळे शहरात उमटले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून आज धुळ्यातील संतप्त आंबेडकरवादी जनतेने गिरीश महाजन यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
नेमकी घटना काय?
नाशिक येथे आयोजित एका कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन भाषण करत होते. यावेळी त्यांनी अनेक महापुरुषांचा उल्लेख केला, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही, असा आरोप करण्यात आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत, तेथे उपस्थित एका वन विभागाच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने भर कार्यक्रमात उभे राहून आपला निषेध नोंदवला. तसेच, मंत्री महाजन यांनी याबद्दल माफी मागावी, अशी आग्रही मागणी केली. या घटनेचे व्हिडिओ आणि बातम्या प्रसारमाध्यमे व सोशल मीडियाच्या माध्यमातून क्षणात राज्यभर पसरल्या.
धुळ्यात तीव्र पडसाद
सोशल मीडियावर ही बातमी समजताच धुळे शहरातील आंबेडकरवादी कार्यकर्ते आक्रमक झाले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एकत्र जमत कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांचा धिक्कार असो,” अशा घोषणा देत जमावाने महाजन यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
यावेळी बोलताना आंदोलकांनी सांगितले की, महामानवांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. जोपर्यंत मंत्री गिरीश महाजन या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत आमचा विरोध कायम राहील. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.












