धुळे : येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्याने विज्ञानाच्या क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले आहे. माध्यमिक विभागातील विद्यार्थी आर्यन केसराम पावरा याने तयार केलेल्या ‘सेफ्टी इंडियन आर्मी’ (Safety Indian Army) या उपकरणाची आणि आर्यनची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे अनेर डॅम आश्रम शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नुकतेच नागपूर येथील पंजाबराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत ५३ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात राज्यभरातून अनेक बाल वैज्ञानिकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये अनेर डॅम येथील आश्रम शाळेतील (माध्यमिक विभाग) आर्यन पावरा याने संरक्षण क्षेत्राशी निगडीत ‘सेफ्टी इंडियन आर्मी’ हे अभिनव उपकरण सादर केले होते. या उपकरणाचे वेगळेपण आणि उपयुक्तता पाहून परीक्षकांनी आर्यनची निवड राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनासाठी केली आहे.
आर्यनच्या या यशात त्याला शाळेचे शिक्षक एच. एफ. अहिरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यनने हे उपकरण विकसित केले असून, त्यात तांत्रिक बाबींचा अचूक वापर केला आहे.
प्रकल्प अधिकाऱ्यांकडून कौतुक
आर्यनच्या या यशाबद्दल आणि शाळेचे नाव लौकिक केल्याबद्दल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी आर्यनचे विशेष कौतुक केले आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रती अशी रुची निर्माण होणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगत, त्यांनी आर्यनला पुढील राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या निवडीमुळे आर्यनवर सध्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












