धुळे : साक्री रोड परिसरातील ‘मोगलाई’ भागाचे काही वर्षांपूर्वी ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्यात आले. या नामांतराचे औचित्य साधून या ठिकाणी किल्ल्याच्या तटबंदीसारखे भव्य आणि सुंदर प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. मात्र, लोकार्पण होऊन अवघा महिनाभर लोटत नाही तोच या प्रवेशद्वारावरील ‘छत्रपती संभाजीनगर’ हा डिजिटल नामफलक बंद पडल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

साक्री रोड भागाचे सुशोभिकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला आहे. विशेषतः या ठिकाणी उभारण्यात आलेले प्रवेशद्वार हे अत्यंत कोरीव दगडी कामात तयार करण्यात आले असून, एखाद्या ऐतिहासिक किल्ल्याच्या महाद्वाराचा भास या ठिकाणी होतो. हे प्रवेशद्वार साक्री रोड परिसराच्या वैभवात भर घालत असतानाच आता निकृष्ट कामाचे नमुने समोर येऊ लागले आहेत.
नेमकी समस्या काय..?
काम पूर्ण होऊन जेमतेम एक महिना झाला असतानाच, प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस लावण्यात आलेल्या ‘छत्रपती संभाजीनगर’ या डिजिटल लाईट्सच्या नावातील काही अक्षरे आणि लाईट्स बंद पडले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून हे नाव अर्धवट आणि अंधारात दिसत असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचे आणि शिवप्रेमींचे लक्ष वेधले जात आहे.
निधीच्या विनियोगावर संशय
इतक्या भव्य कामासाठी वापरण्यात आलेले इलेक्ट्रिक साहित्य इतक्या लवकर खराब झाल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कामात वापरण्यात आलेल्या निधीचा योग्य विनियोग झाला आहे की नाही, याबद्दल आता साक्री रोड येथील स्थानिक नागरिकांमधून शंका उपस्थित केली जात आहे. कंत्राटदाराने तात्पुरती मलमपट्टी करून काम उरकले की काय, अशी चर्चा आता परिसरात सुरू आहे.
नागरिकांची मागणी:
‘छत्रपती संभाजीनगर’ हे नाव अस्मितेचा विषय असून, अशा प्रकारे प्रवेशद्वाराची दुरावस्था झाल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. संबंधित विभागाने किंवा कंत्राटदाराने याची तातडीने दखल घेऊन हे डिजिटल नाव पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.












