धुळे:शिरपूर येथील तालुका कृषी कार्यालयातील तालुका कृषी अधिकारी आणि एका डेटा एंट्री ऑपरेटरला ५,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी रंगेहाथ पकडले. बियाणे विक्रीच्या अनुदानाची फाईल मंजूर करण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती.

नेमकी घटना काय..?
तक्रारदाराचे शिरपूर तालुक्यातील मौजे बाभळज येथे शासनमान्य बी-बियाणे आणि खत विक्रीचे दुकान आहे. त्यांनी २०२५-२६ या वर्षात शासनाच्या ‘कृषी उन्नती योजना’ अंतर्गत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात गव्हाच्या बियाणांची विक्री केली होती. या विक्रीपोटी मिळणारे १,४०,००० रुपयांचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी त्यांनी आवश्यक कागदपत्रे तालुका कृषी कार्यालयात जमा केली होती.

या प्रकरणातील आरोपी सुनील धनराज पाटील (वय ३१, डेटा एंट्री ऑपरेटर) याने ही फाईल मंजूर करून देण्यासाठी आणि तालुका कृषी अधिकारी संजय हिम्मतराव पवार (वय ४३) यांच्या संमतीने ५,००० रुपयांची मागणी केली होती.
एसीबीची कारवाई
तक्रारदाराने या मागणीबाबत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार ११ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाली. आज, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सापळा रचला असता, सुनील पाटील याने तक्रारदाराकडून ५,००० रुपये स्वीकारले. लाच स्वीकारताच पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले.
कारवाई करणारे पथक:
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल व त्यांच्या पथकाने केली आहे.












