धुळे: अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शेवाळी फाटा परिसरातील एका हॉटेलच्या बाजूला सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, पीडित महिलेची सुटका केली आहे. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील कुंटणखान्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक मिना तडवी यांना शेवाळी फाटा येथील एका हॉटेलच्या बाजूला देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
बनावट गिऱ्हाईक पाठवून टाकला छापा
माहितीची खात्री पटल्यानंतर, पोलिसांनी साक्रीचे एस.डी.पी.ओ. संजय बांबळे यांची भेट घेऊन कारवाईचे नियोजन केले. एका बनावट ग्राहकाद्वारे खात्री केल्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत रोहित काशिनाथ गोसावी (वय ३२, रा. अष्टाणे, ता. साक्री) याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान, हा व्यवसाय कुणाल सरग, शुभम चव्हाण, सनी भदाणे आणि आतिष ठाकरे (सर्व रा. साक्री) हे चालवत असल्याचे समोर आले आहे. हे आरोपी पीडित महिलांच्या असहायतेचा फायदा घेऊन, पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत होते.
मुद्देमाल जप्त आणि गुन्हा दाखल
पोलिसांनी घटनास्थळावरून ६,१०५ रुपये किमतीचा मुद्देमाल आणि साहित्य जप्त केले आहे. साक्री पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा र.नं. ३१/२०२६ नुसार अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५, ७(१)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या रोहित गोसावी पोलिसांच्या ताब्यात असून, फरार झालेल्या चारही संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
कारवाई पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, एस.डी.पी.ओ. संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मिना तडवी, अनिता पवार, अनिता माळी, कमल पावरा, कैलास जोहरे आणि शरद काटके यांच्या पथकाने केली आहे.












