धुळेः धुळ्यातील गुलमोहर गेस्ट हाऊस पैसे प्रकरणात धुळे पोलिसांना सखोल चौकशी दरम्यान आणखी एका व्यक्तीला पकडण्यात यश आले आहे प्रकरणात निष्पन्न झालेल्या तिसऱ्या अज्ञात संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. गौतम नारायण वाघमारे (वय ४३, सध्या रा. पनवेल, मूळ गाव मुखेड, नांदेड) असे त्याचे नाव असून, त्याला सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर पाटील यालाही आज धुळ्यात हजर केले आहे.

१०२ क्रमांकाच्या खोलीत तब्बल १ कोटी ८४ लाख रुपयांची रोकड माजी आमदार अनिल गोटे यांच्या आंदोलनानंतर हस्तगत करण्यात आली होती. ही रक्कम विधिमंडळ अंदाज समिती सदस्यांना देण्यासाठी जमा केली असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार गोटे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.या प्रकरणात विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आ. अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. पाटील यांचे निलंबनही करण्यात आले असून, या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या एसआयटी (विशेष तपास पथक) चौकशीची घोषणा केली आहे.धुळे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा कसून अभ्यास केला आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती नेमक्या कोण होत्या, दिसलेल्या गाड्या कोणाच्या होत्या आणि या व्यक्ती गुलमोहर शासकीय विश्रामगृहात का आल्या होत्या, याबाबत ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना सीसीटीव्ही फुटेज दाखवून त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या इतर व्यक्तींनाही ओळखून त्यांना तपासामध्ये सहभागी करूनघेण्यात येणार आहे. तसेच, आरोपींचे सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) देखील पोलिसांना प्राप्त झाले असून त्यातून अधिक धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
