हिंदी सक्ती आणि मराठी शाळा,शिक्षक, शैक्षणिक धोरण व बोलीभाषा भवितव्य यावर चर्चा
धुळे : महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे व अहिराणी, भिलोरी,मावची, गोंडी,कोकणी,झाडीबोली, वऱ्हाडी इत्यादी बोलीभाषांचे संविधानिक राज्य आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी १०९ हुतात्म्यांनी बलिदान दिलेले असूनही महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांवर पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचे असंविधानिक प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दोन शासननिर्णय मागे घेतले तरीही तिसऱ्या निर्णयानुसार नरेंद्र जाधव समिती नेमून सक्तीची टांगती तलवार ठेवलीच आहे.बालमानसशास्त्र,शिक्षणशास्त्र धुडकावून महाराष्ट्राच्या ऊरावर हिंदी सक्ती लादण्याची लबाडी चालूच आहे.या अन्यायाविरोधात विद्रोही सांस्कृतिक चळवळ व समविचारी संघटनांच्यावतीने विश्व आदिवासी दिन आणि संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे , क्रांतीसिंह नाना पाटील,लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्ताने १० ऑगस्ट २०२५ रोजी शिंपी सभागृह,गरुड वाचनालय, क्यूमाईन क्लब समोर,जेलरोड, धुळे येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळात भाषा व संस्कृती जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारचे मराठीविरोधी व विद्यार्थीविरोधी जीआर जनतेसमोर आणून लढा उभारणारे मुंबईतील भाषा आंदोलनाचे अभ्यासू नेते प्रा.डॉ.दीपक पवार हे परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत. यावेळी अहिराणी साहित्यिक व परिषदेचे स्वागताध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी(धुळे), विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा प्रतिमा परदेशी (पुणे), भाषातज्ञ प्रकाश परब (मुंबई), साहित्यिक प्रा. डॉ.सतीश मस्के, (पिंपळनेर) शिक्षण चळवळीचे आर टी गावित (नंदुरबार) हे प्रमुख वक्ते आहेत.विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य उपाध्यक्ष अर्जुन बागुल, अनिस राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील,अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे, प्रा. भगवान पाटील, एड विशाल साळवे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनाने व महाराष्ट्र गीतांनी (गायक:भास्कर अमृतसागर) परिषदेची सुरुवात होईल. यावेळी ‘भाषिक वर्चस्वाचे राजकारण’ हे डॉ. मारोती कसाब व डॉ.विलास बुवा संपादित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.अशी माहिती भाषा व संस्कृती जागर परिषदेचे निमंत्रक कॉ किशोर ढमाले (सत्यशोधक) व कार्याध्यक्ष रवींद्र अण्णा मोरे,नरेंद्र खैरनार (बामसेफ) यांनी दिली आहे.
