धुळे : शहरातील प्रभाग क्रमांक एक अंतर्गत झेंडा चौक परिसरात सोमवारी (13 ऑक्टोबर) उशिरा रात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक हायना (तरस / लकडबग्गा) स्पष्टपणे दिसून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.ही घटना रात्री 11:45 वाजताच्या सुमारास घडली असून, नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर लकडबग्गा प्राणी सामान्यतः जंगलात वास्तव्य करणारा असून, त्याचे दात तीक्ष्ण व जबडा अत्यंत मजबूत असतो. हा प्राणी कुत्र्यांवर, शेळ्यांवर, तसेच असावधानतेने चालणाऱ्या मनुष्यावर देखील हल्ला करू शकतो. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना आणि लहान मुलांना याचा गंभीर धोका संभवतो.या घटनेनंतर परिसरातील रहिवासी मोठ्या प्रमाणावर भीती आणि घबराटीत असून अनेकांनी रात्री बाहेर जाणे बंद केले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, मागील काही दिवसांपासून परिसरात कुत्र्यांचे ओरडण्याचे आवाज वाढले होते, ज्यावरून हा प्राणी आसपासच फिरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.सदर भाग हा शिंदखेडा वनक्षेत्राच्या हद्दीत येतो. या पार्श्वभूमीवर नागरिक प्रतिनिधी ललित गंगाधर माळी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश कांबळे (शिंदखेडा प्रादेशिक कार्यालय) यांना लेखी पत्र पाठवून तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे. त्यांनी परिसरात पिंजरे लावून पकड मोहिम सुरू करावी, तसेच वनविभागाचे विशेष पथक पाठवावे, अशी मागणी केली आहे.












