आनंद लोंढे यांची प्रशासनाकडे मागणी
धुळे : सिव्हिल हॉस्पिटल च्या आवारातील वापरात नसलेली अंदाजे 1500 चौ. फुट जागा प्रियदर्शनी सम्राट अशोक स्मारक उभारणीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत आनंद लोंढे यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन व आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की धुळे शहरातील सामान्य रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) हे धुळे-2 नगर भूमापन क्रमांक 28 या मालमत्ता पत्रकानुसार एकूण 34857.4 चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या शासकीय जागेवर वसलेले आहे. ह्या जागेचा मूळ हक्कधारक सरकार (सिव्हिल हॉस्पिटल) असा आहे. सदर आंवारामध्ये विविध विभागांचे इमारती व वैद्यकीय बांधकाम करण्यात आले असून, संतोषी माता मंदिर चौक कडील कंपाउंडच्या आतील बाजूस सुमारे 1500 चौ. फुट त्रिकोणी आकाराची जागा अनेक वर्षांपासून वापरात नाही. त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम नाही, झाडी-झुडपे उगवलेली आहेत तसेच बाहेरील भिंतीलगत चहा-नाश्ता टपरीवाल्यांनी अतिक्रमण केलेले आहे.उक्त जागा सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिपत्याखाली असून प्रत्यक्षात कोणत्याही उपयुक्त कार्यासाठी तिचा वापर होत नाही. त्यामुळे या निष्क्रिय व दुर्लक्षित जागेचा समाजोपयोगी से उपयोग व्हावा प्रियदर्शनी सम्राट अशोक स्मारक समिती ही विविध नोंदणीकृत असून चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या स्मृतीस अर्पण केलेले भव्य स्मारक उभारण्याचा उपक्रम आहे

उत्तर महाराष्ट्रात आजपर्यंत सम्राट अशोक यांचा कोणताही पुतळा किंवा स्मारक नाही. सम्राट अशोक हे केवळ बौद्ध सम्राट नसून भारतीय इतिहासातील एक आदर्श, न्यायप्रिय व लोकहितैषी शासक म्हणून सर्वधर्मीयांना पूजनीय आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील अशोक चक्र या स्वरूपात देशाने स्वीकारला आहे. धुळे शहरात आणि उत्तर महाराष्ट्रात 50 हजार हून अधिक बौद्ध अनुयायी तसेच असंख्य इतर धर्मीय नागरिक सम्राट अशोक यांच्या आदर्शापासून प्रेरित आहेत. या स्मारकामुळे धुळे जिल्ह्याचे सांस्कृतिक महत्व वाढेल.

म्हणूनच, आम्ही नम्र विनंती करतो की, सिव्हिल हॉस्पिटल, धुळे यांच्या आवारातील वरील वापरात नसलेली सुमारे 1500 चौ. फुट जागा प्रियदर्शनी सम्राट अशोक स्मारक उभारणीसाठी आमच्या समितीला उपलब्ध करून द्यावी किंवा प्रशासनाने स्वतः या ठिकाणी सम्राट अशोक यांचे स्मारक उभारावे. त्यासाठी समिती पूर्ण सहकार्य प्रशासनास करेल. स्मारक उभारणीनंतर परिसर सुशोभित ठेवण्याची, कोणताही वैद्यकीय वापर बाधित न करण्याची आणि संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याची आम्ही जबाबदारी स्वीकारू असे आवाहन निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले.












