धुळे/साक्री:साक्री आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन आणि बाजरी चोरी करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश करण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि साक्री पोलिसांना मोठे यश आले आहे. या संयुक्त कारवाईत ५ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पिकअप वाहनासह सुमारे ९ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून साक्री उपविभागातील शेतकऱ्यांच्या शेतातुन कापूस, सोयाबीन व बाजरी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि साक्री पोलिसांना सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
अशी झाली कारवाई
तपासादरम्यान पोलिसांना तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदाराद्वारे समजले की, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सोन्या उर्फ सोनू निवा भिल (रा. किरवाडे, ता. साक्री, सध्या रा. सिन्नर) हा सिन्नर (जि. नाशिक) येथे आहे. पथकाने सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली.
त्याच्या माहितीवरून पोलिसांनी विनोद गुलाब अहिरे (रा. मुल्हेर), सागर अनिल मालचे, लक्ष्मण माणिक मालचे आणि राज संभाजी मालचे (सर्व रा. धाडणे, ता. साक्री) या अन्य चार साथीदारांना पिंपळनेर येथील चौफुलीवरून ताब्यात घेतले.आरोपींनी मालपूर, विजापूर, नांदवण, काबदे, बल्हाणे, विरखेल व घनेर या शिवारातील शेतातून पिकअप वाहनाचा वापर करून धान्य चोरी केल्याचे कबूल केले आहे. या कारवाईमुळे साक्री पोलीस ठाण्यातील ४ आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यातील ३ असे एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपींकडून चोरीस गेलेला शेतमाल आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत एकूण किंमत: ९,८५,५०० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अनय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि साक्रीचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी व त्यांच्या पथकाने केली आहे. शेतकऱ्यांच्या मालाची चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद केल्यामुळे साक्री पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.












