नवी दिल्लीत विद्यार्थ्यांनी पटकावला ‘विजेता’ पुरस्कार
धुळे: देशातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘इव्हॉल्व्ह – द ग्लोबल फॅशन रनवे’ (Evolve – The Global Fashion Runway) या भव्य फॅशन शोमध्ये आयडीटी एज्युकेशन्सच्या (IDT Educations) फॅशन डिझाइन विद्यार्थ्यांनी आपल्या कलेची छाप पाडत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. नवी दिल्लीतील निकुंज हॉटेल येथे २१ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात आयडीटी एज्युकेशन्सने ‘विजेता’ (Winner) ठरत पुरस्कारावर आपले नाव कोरले.विद्यार्थ्यांना फॅशन विश्वाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी या शोमध्ये फिटिंग डे, इंटरव्ह्यू डे आणि अंतिम फॅशन शो डे अशा विविध टप्प्यांचा समावेश होता. या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना फॅशन जगतातील बारकावे शिकण्याची सुवर्णसंधी मिळाली.
दिल्लीच्या रॅम्पवर ‘आयव्हरी’ आणि ‘बीड्स’ची जादू
आयडीटीच्या विद्यार्थ्यांनी या शोमध्ये ‘Ivory Glamour Gala’ (आयव्हरी ग्लॅमर गाला) आणि ‘Beads & Beyond’ (बीड्स अँड बियॉन्ड) या दोन विशेष कलेक्शन्सचे सादरीकरण केले. आकर्षक फॅब्रिक्स, उत्कृष्ट हँडवर्क, ग्लॅमरस कट्स आणि नाविन्यपूर्ण स्टाइलिंगच्या जोरावर या दोन्ही कलेक्शन्सनी दिल्लीच्या रॅम्पवर उपस्थित मान्यवरांचे आणि फॅशन प्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले.मान्यवरांच्या हस्ते गौरव
प्रसिद्ध फॅशन डिझायनर अंजू मोदी आणि आयडीएचे संस्थापक व सीईओ बतुल अली यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शोच्या समारोपाप्रसंगी आयडीटी एज्युकेशन्सला ‘विजेता’ म्हणून घोषित करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते ‘विनर चेक’ (Winner Cheque) प्रदान करण्यात आला.
तसेच, आयडीटी एज्युकेशन्सचे फाऊंडर व डायरेक्टर श्री. महेंद्र शेवाळे आणि सेंटर हेड कु. स्वर्णिता देहाडे यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थी डिझाइनर्सना यावेळी सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक
या फॅशन शोमध्ये आयडीटीच्या नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव या शाखांमधील विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. यामध्ये निकिता नागरे, रोशनी रुमने, दिशा सोळुंखे, ईश्वरी गुंजाळ, सानिका पाटील, दीपाली हलवार, तन्वी देशपांडे, लिपाक्षी सोनवणे, सानिया शेख, राजश्री बिरपन, वैश्णवी पाटील, मदिहा खान, ज्ञानेश्वरी दीक्षित, किर्ती पाटील, आयशा पाशा, दिव्या पाटील, शुभांगी सोनार, वैश्णवी बोरसे आणि श्रेया जैसवाल यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांच्या या देदीप्यमान यशामागे संस्थेचे फाऊंडर व डायरेक्टर श्री. महेंद्र शेवाळे आणि सौ. स्नेहल शेवाळे यांचे कुशल मार्गदर्शन, तसेच संपूर्ण स्टाफचे सातत्यपूर्ण सहकार्य मोलाचे ठरले आहे. राष्ट्रीय पातळीवरील या यशामुळे आयडीटीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.












