धुळे : निखिल सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या ठिकाणी सूर्यवंशी सर यांनी भाषणात असे सांगितले की पत्रकारिता क्षेत्रात काम करताना आपल्याला मिळालेला वैचारिक आणि अनुभवाचा वारसा हीच आपली खरी श्रीमंती आहे. पत्रकारिता ही केवळ एक व्यवसाय नसून ती आपली ‘जात’ आहे, अशा शब्दांत समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा गौरव करण्यात आला. येथे आयोजित पत्रकार संघाच्या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना निखिल सरांनी पत्रकारांच्या संघर्षावर आणि सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला.
अनुभव आणि वैचारिकतेची सांगड
यावेळी बोलताना सांगण्यात आले की, आपल्या पत्रकार संघात वैचारिकता, संस्कृती आणि अनुभवाचा मोठा वारसा आहे. मोहन मोरे यांच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व जुन्या आठवणींना उजाळा देत विषयांचे सखोल विश्लेषण करत असतात. त्यांच्या लेखनातून आणि अनुभवातून नवीन पिढीला शिकण्यासारखे खूप काही आहे. तसेच, आबासाहेब आणि इंगळे साहेब यांच्या अनुभवाची शिदोरी, सचिन भाऊ यांची सामाजिक जाण आणि संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व यामुळे हा पत्रकार संघ वैचारिकदृष्ट्या समृद्ध झाला आहे.
सामान्य कुटुंबातून संघर्षाचा प्रवास
कार्यक्रमात बोलताना एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भर देण्यात आला की, येथे उपस्थित असलेले बहुतांश पत्रकार हे सामान्य कुटुंबातील आहेत. कोणताही मोठा वारसा नसताना केवळ जिद्द आणि समाजासाठी काहीतरी चांगले करण्याच्या भावनेतून आज प्रत्येकजण या क्षेत्रात पाय रोवून उभा आहे. “पत्रकारिता हीच आमची जात आहे,” असे सांगतानाच, याचा अर्थ जातीवाद नसून अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा आणि समाजात परिवर्तन घडवून आणणारा ‘विचार’ म्हणजे ही जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
एकमेकांच्या साथीने समाजहित
पत्रकारिता करताना एकमेकांना मार्गदर्शन करण्यापेक्षा एकमेकांना साथ देणे अधिक महत्त्वाचे आहे. आपण सर्वजण एकाच ध्येयाने प्रेरित आहोत. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि जनहित जोपासण्यासाठी आपण या व्यासपीठाच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. आगामी काळातही एकमेकांच्या मदतीने आणि सहकार्याने समाजाचे प्रश्न मांडण्याचे उद्दिष्ट सर्वांनी मिळून पूर्ण करूया, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.













