धुळे पोलिसांनी गुन्हेगारांना दिली सक्त ताकीद; ‘मकोका’सह हद्दपारीचा इशारा
धुळे (प्रतिनिधी): आगामी धुळे महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दल ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शहरासह जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची चांगलीच ‘झाडाझडती’ घेतली. शुक्रवारी (दि. २६) पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून ५४ सराईत गुन्हेगारांना समज देण्यात आली असून, निवडणूक काळात गडबड केल्यास थेट ‘मकोका’ आणि ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून, पोलीस अधीक्षक कार्यालयात शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यावेळी गुन्हेगारांच्या सध्याच्या हालचाली, त्यांच्या उदरनिर्वाहाची साधने आणि यापूर्वी त्यांच्यावर करण्यात आलेली प्रतिबंधात्मक कारवाई याचा आढावा घेण्यात आला.
निवडणूक काळात ‘या’ कायद्यांचा बडगा
सराईत गुन्हेगारांनी आगामी निवडणूक काळात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभाग घेतल्यास, त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये हद्दपार, MCOCA (मकोका), Mini MCOCA (BNS कलम १११), पेटी क्राईम (BNS कलम ११२) आणि MPDA (स्थानबद्धता) यांसारख्या कठोर कलमांखाली कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद पोलिसांनी दिली आहे.
जामीन रद्द करण्याची तंबी
सध्या जामिनावर बाहेर असलेल्या गुन्हेगारांनी कोणत्याही गैरकृत्यात सहभाग घेतल्याचे आढळल्यास, त्यांनी जामिनाच्या अटींचा भंग केला असे मानून त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अहवाल सादर करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर ‘सायबर पेट्रोलिंग’
केवळ प्रत्यक्ष गुन्हेगारीच नव्हे, तर डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पोलिसांची नजर असणार आहे. गुन्हेगारांच्या सोशल मीडिया हालचालींवर धुळे पोलिसांकडून ‘सायबर पेट्रोलिंग’ करण्यात येत आहे. सोशल मीडियावर कोणतेही प्रक्षोभक व्हिडिओ, रील्स, लेख किंवा फोटो व्हायरल केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
एकूण ५४ गुन्हेगारांची हजेरी
या विशेष मोहिमेत धुळे शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ५४ सराईत गुन्हेगार हजर होते. यात धुळे शहर (०९), आझादनगर (१२), देवपूर (१२), पश्चिम देवपूर (०३), मोहाडीनगर (०७) आणि चाळीसगाव रोड (११) पोलीस ठाण्यातील गुन्हेगारांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि डी.बी. पथक या गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अनप डेहेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्रीराम पवार तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी पार पाडली.













