धुळे : “गेल्या निवडणुकीत माझा केवळ ४५ मतांनी निसटता पराभव झाला, तरीही मी जनतेशी नाळ तोडली नाही. मात्र, हद्दवाढीच्या नावाखाली मोहाडी आणि अवधानची स्वतःच्या स्वार्थासाठी जाणूनबुजून ‘तूट’ करण्यात आली आहे. अवधानमध्ये गटारींची सोय नाही, रस्ते तोडले जात आहेत; हे सर्व केवळ पैसे खाण्याचे धंदे सुरू आहेत,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्र. 18 चे उमेदवार कुणाल पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली.
अवधान येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.बोगस कामे आणि भ्रष्टाचाराचा पाढा यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल मुंदडा यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “ही निवडणूक धर्माची नसून विकासाची आहे. सत्ताधाऱ्यांनी मालमत्ता करात भरमसाठ वाढ करून सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. प्रभागात झालेली कामे अत्यंत बोगस दर्जाची असून, भ्रष्टाचार बोकाळला आहे. कुणाल पवार यांच्याकडे कामाचा मोठा अनुभव असून, ते प्रामाणिकपणे भागाचा कायापालट करतील. त्यामुळे एका दमदार उमेदवाराला साथ द्या,” असे आवाहन त्यांनी केले.

भाजपचा अन्याय; मतदारांची होणार परवड
हद्दवाढ प्रक्रियेवर बोलताना नेत्यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. हद्दवाढीनंतर मतदारांना मतदानासाठी अनेक किलोमीटर लांब जावे लागणार आहे, हा मतदारांवर केलेला मोठा अन्याय आहे. हा अन्याय रोखण्यासाठी आणि भागाच्या शाश्वत विकासासाठी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल मुंदडा, जोसेफ मलबारी, प्रमोद साळुंखे, सुमित पवार, अमोल शिंदे, भानुदास काका यांसह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि अवधान परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभे दरम्यान कुणाल पवार यांनी “मला मोहाडी आणि अवधानच्या जनतेची सेवा करण्याची संधी द्या,” अशी भावनिक साद मतदारांना घातली.













