धुळे:केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीला आज प्रशासकीय उदासीनतेचे ग्रहण लागले. तब्बल चार ते पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला खुद्द जिल्हाधिकारी डॉ. भाग्यश्री विसपुते यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने उपस्थित खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

धुळे जिल्हा दिशा समितीची बैठक आज (शुक्रवार) खासदार डॉ. शोभा बच्छाव आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲड. गोवाल पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जाते. मागील काही महिन्यांपासून ही बैठक प्रलंबित होती. अखेर सुमारे चार ते पाच महिन्यांच्या कालावधीनंतर आज ही बैठक सुरु झाली
मात्र, बैठकीच्या सुरुवातीलाच जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. भाग्यश्री विसपुते अनुपस्थित होत्या. त्यांच्यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या विभागांच्या प्रमुखांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. लोकप्रतिनिधी विकासाचा आढावा घेण्यासाठी उपस्थित असताना प्रशासकीय अधिकारी मात्र गैरहजर राहिल्याने खासदार डॉ. शोभा बच्छाव आणि खासदार ॲड. गोवाल पाडवी यांनी याबाबत जाब विचारत आपला संताप व्यक्त केला.
विकासकामांचा आढावा आणि अंमलबजावणीतील अडचणी सोडवण्यासाठी अधिकारी उपस्थित असणे अनिवार्य असताना, त्यांच्या अनुपस्थितीमुळे लोकप्रतिनिधींचा अवमान झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील विकासकामांच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.













