सोजाई (सप्तश्रुंगी) आदिवासी महिला विकास फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम.
पुणे / प्रतिनिधी: जुन्या आणि कालबाह्य रुढी-परंपरांना फाटा देत समाजामध्ये सकारात्मक परिवर्तनाचा संदेश देणारा एक अनोखा उपक्रम पुण्यात पार पडला. मकर संक्रांतीचे औचित्य साधून ‘सोजाई (सप्तश्रुंगी) आदिवासी महिला विकास फाउंडेशन’च्या वतीने विधवा महिलांसाठी विशेष हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०८ महिलांना ‘पूर्णांगिनी’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
पतीच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या आणि अनेकदा सामाजिक प्रवाहापासून दूर ठेवल्या जाणाऱ्या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे, या सोहळ्यात महिलांना हळदी-कुंकू लावून सन्मान तर केलाच, पण ‘वाण’ म्हणून साडीसोबतच ‘भारतीय संविधाना’ची प्रत भेट देऊन त्यांच्या हक्कांची आणि अस्मितेची जाणीव करून देण्यात आली

स्त्री स्वतःच एक शक्तिपीठ: ॲड. जयश्री सोनवणे
कार्यक्रमात बोलताना संस्थेच्या सचिव ॲड. जयश्री सोनवणे म्हणाल्या, “स्त्री ही आपल्या कुटुंबाची खरी शिल्पकार असते. ती मुलगी, पत्नी आणि माता अशा विविध भूमिकांतून समाज घडवते. दुर्दैवाने वैधव्य आले तर त्यात तिचा काय दोष? तिला शुभ कार्यात दुय्यम वागणूक देणे चुकीचे आहे. स्त्री स्वतःच एक शक्तिपीठ असून तिला सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे.”
१८ वर्षांनंतर मिळाला सन्मान: उपस्थितांचे डोळे पानावले
या कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत भावूक झाले होते. अनेक महिलांना अश्रू अनावर झाले. आपल्या भावना व्यक्त करताना एका भगिनीने सांगितले की, “अल्पवयात पतीचे निधन झाले आणि गेली १८ वर्षे मी पावलोपावली दुजाभाव सहन करत आहे. आज इतक्या वर्षांनी कोणीतरी आम्हाला हळदी-कुंकू लावून सन्मान दिला, हे पाहून भरून आले आहे.” या प्रसंगाने उपस्थितांची मने हेलावली.
विधवा नव्हे, आता ‘पूर्णांगिनी’: डॉ. ओंकार चव्हाण
संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. ओंकार चव्हाण यांनी यावेळी एक महत्त्वपूर्ण विचार मांडला. ते म्हणाले, “अशा महिलांना ‘विधवा’ न म्हणता ‘पूर्णांगिनी’ म्हटले जावे. यामुळे त्यांना मानसिक बळ मिळेल आणि समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यांचे कर्तृत्व समाजासमोर यावे, हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे.”
तर संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत चव्हाण यांनी सांगितले की, अनेक महिला उच्चशिक्षित, डॉक्टर, प्राध्यापक असूनही केवळ पती नसल्यामुळे त्यांचे कर्तृत्व झाकोळले जाते. त्यांच्या सामाजिक सन्मानासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे.
या भावपूर्ण सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत चव्हाण, सचिव ॲड. जयश्री सोनवणे, उपाध्यक्ष डॉ. ओंकार चव्हाण, तसेच दत्तात्रय चव्हाण, द्रोपदी सोनवणे, लताबाई चव्हाण, संगीता बोरुडे यांच्यासह पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.












