धुळे : शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीतील जनता सोसायटी परिसरातून एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जनता सोसायटी, हजरत अली मशिदीजवळ राहणारी एक १२ वर्षे १ महिना वयाची मुलगी २८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास “मी दादीच्या घरी जाते,” असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र, ती तिथे पोहोचली नाही आणि घरीही परतली नाही. नातेवाईकांनी शोधाशोध करूनही ती मिळून न आल्याने मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेतली.पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित आरोपी शुभम मांगीलाल जाधव (वय २५, रा. सुंदर नगर तांडा, चिंचगव्हाण, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ३० जानेवारी रोजी सायंकाळी अटक केली.सुरुवातीला या प्रकरणात बी.एन.एस. कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल होता. मात्र, तपासादरम्यान समोर आलेल्या बाबींनुसार आता या गुन्ह्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (POCSO) च्या कलम ८ आणि १२ ची वाढ करण्यात आली आहे.
सदर कारवाई चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश टी. पवार आणि त्यांच्या पथकाने केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.












