धुळे: शहरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर दोंडाईचा पोलिसांनी शुक्रवारी (दि. ३१) धडक कारवाई केली. या कारवाईत देशी दारूचा मोठा साठा आणि वाहन असा एकूण ६ लाख ६१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी रोजी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना गुप्त माहिती मिळाली होती की, धुळ्याकडून दोंडाईचाकडे एका बोलेरो पिकअपमधून अवैध दारूची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोसई इमरान खान व त्यांच्या पथकाने शहरातील मंडळ चौफुली येथे सापळा रचला. संशयित बोलेरो पिकअप (क्र. एम एच १८ बीजी १०४०) येताच पोलिसांनी ती अडवून तिची झडती घेतली असता त्यात अवैध दारू आढळून आली.
पोलिसांनी घटनास्थळावरून वाहन चालक शेखर पंडित माळी (वय ४४, रा. प्रियदर्शनी नगर, नगाव बारी, देवपूर, धुळे) याला ताब्यात घेतले आहे.
असा आहे जप्त केलेला मुद्देमाल
वाहन: ५,५०,००० रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी.दारू साठा: १,११,३६० रुपये किमतीची देशी दारू (‘टँगो पंच’ नावाचे लेबल असलेल्या १८० मिलीच्या सीलबंद बाटल्या). एकूण २९ खोके (प्रत्येक खोक्यात ४८ नग, एकूण १३९२ बाटल्या).
एकूण मुद्देमाल: ६,६१,३६० रुपये.
संशयित चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोसई इमरान खान करत आहेत.
यांनी केली कारवाई:
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश एन. सोनवणे, पोसई इमरान खान, पोसई राजन दुसाने, पोकॉ निलेश होलोरे, प्रविण निकुंभे, राकेश रोकडे आणि ललित काळे यांच्या पथकाने केली.












