धुळे: मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणून पुढे गुजरात राज्याकडे अवैध रित्या नेला जाणारा विदेशी दारूचा मोठा साठा धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४० लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून धुळ्यामार्गे गुजरात राज्यात एका कंटेनर मधून विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ३१ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी धुळे शहरातील नवीन सिव्हिल हॉस्पिटल समोर, धुळे-जळगाव बायपास हायवेवर सापळा रचला.

संशयास्पद टाटा कंपनीचा कंटेनर (क्रमांक आर. जे. ५२/ जी. ए. ३६३०) तिथे आला असता पोलिसांनी तो अडवला. यावेळी कंटेनर चालक अजय राजाराम वानखेडे (वय ५२, रा. इंदोर, मध्य प्रदेश) याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली व कंटेनरमध्ये ‘स्पेअर पार्ट्स’ असल्याचे सांगितले.
मात्र, पोलिसांनी संशय बळावल्याने पंचांसमक्ष कंटेनरची तपासणी केली. त्यावेळी आतमध्ये ‘किंगफिशर एक्स्ट्रा स्ट्रॉन्ग प्रीमियम बिअर’चे (Kingfisher Extra Strong Premium Beer) तब्बल ४०० बॉक्स आढळून आले. या दारूची विक्री फक्त मध्य प्रदेश राज्यापुरती मर्यादित असताना तिची अवैध वाहतूक केली जात होती.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
या कारवाईत पोलिसांनी १५ लाख ३६ हजार रुपये किमतीचे बिअरचे बॉक्स, २५ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा कंटेनर आणि ३ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ४० लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनजय देवर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मुंडे, तसेच संजय पाटील, पवन गवळी, संदीप पाटील, देवेंद्र ठाकूर आणि मयुर पाटील या पथकाने केली आहे.












