धुळे : गो तस्करी करत असताना सोनगीर शिवारात पोलिसांच्या मदतीने पिकअप चालकाला पकडण्यात आले आहे त्यासंदर्भात सोशल मीडियावर देखील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ही कारवाई सोनगीर बसस्थानकाजवळ मंगळवारी सकाळी घडली. त्याचवेळेस गुरांच्या वाहनासोबत पायलेटींग करणाऱ्या कारमधील एकाने वाहन सोडून देण्याचे सांगितले. परिणामी त्याच्यासह तिघांविरोधात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, वाहन सोडून देणे असा सांगणारा भाजप कामगार आघाडीचा पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे
शिंदखेडा तालुक्यातील गोराणे गावाकडून एक पिकअप वाहन सोनगीरच्या दिशेने येत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यानुसार, मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सोनगीर गावातील बसस्थानकाजवळ गोरक्षकांनी सापळा लावला. एमएच १८ एए ४०८५ क्रमांकाची पिकअप वाहन येताच ते अडविण्यात आले. त्यात गुरे बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामागे गुरांच्या कत्तलीचा उद्देश होता. त्याचवेळेस गोरक्षकांजवळ एमएच ०२ सीआर ८०६४ क्रमांकाची कार येवून थांबली.कारमध्ये चालकासह दोघे बसलेले होते. पकडलेली पिकअप वाहन सोडून देण्याचे त्यांच्याकडून गोरक्षकांना सांगण्यात आले. गोरक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तोपर्यंत गोरक्षकांनी पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांना पाहून कारचालकाने पळ काढला होता. पोलिसांनी गुरांसह पिकअप वाहन असा एकूण ४ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले आणि गुरे जप्त करुन ते मालेगाव रोडवरील गो शाळेत पाठविण्यात आले.
याप्रकरणी गोरक्षक कृष्णा अरुण माळी यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, पिकअप चालक गोरख जिभाऊ मिल (रा. भामपूर ता. शिरपूर), पिकअप वाहनाला पायलेटींग करणाऱ्या कारमधील भाजप कामगार आघाडीचा पदाधिकारी दिनेश जगन्नाथ कदम आणि त्याच्यासोबतचा रावण फुलपगारे (दोन्ही रा. गोराणे ता. शिंदखेडा) अशा तिघांविरोधात प्राणी अॅक्टनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
